वाहतूक सुधारण्यासाठी रस्ता दुभाजक हा अतिशय महत्वाचा घटक असतो हे फारसे कधी लक्षात घेतले जात नाही.
रस्ता दुभाजक कशासाठी असतो???
- रस्त्याचे दोन सारखे भाग करणे आणि जायला-यायला गाड्यांना मार्ग ठरवून देणे.
- कोणत्याही गाडीने अचानक उजव्या बाजूला वळू नये आणि आणि वाहतुकीची शिस्त मोडू नये.
- कोणताही पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यात येऊ नये.
- एकूणच वाहतूक निर्वेधपणे आणि शिस्तबद्ध रितीने सुरु राहावी यासाठी रस्ता दुभाजक अतिशय महत्वाचे असतात.
रस्ता दुभाजक कसा असावा यावर आजपर्यंत कोणी फार विचार केल्याचे ऐकिवात नाही... वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी रस्ता दुभाजकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व आजवर दुर्लक्षितच राहिले आहे. त्यातच पुणे महापालिकेने ज्या “कलात्मक” पद्धतीने रस्ता दुभाजकांमध्ये वैविध्य ठेवले आहे, ते पाहता रस्ता दुभाजक ही रस्त्याच्या मध्यभागी उभारलेली एक अडगळीची किंवा काही ठिकाणी शोभेची गोष्ट आहे असे वाटते.
पुणे महापालिकेच्या कामाला निर्बुद्धपणा म्हणावा की निष्काळजीपणा?? की दोन्ही..??!!! (तीच शक्यता अधिक आहे..!!)
पुण्यातल्या रस्ता दुभाजकांची काही खास उदाहरणे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो.
१) कर्वे रस्ता- खंडुजीबाबा चौक ते एसएनडीटी (पौड फाटा)
अनेक वर्षांपूर्वी या रस्त्यावर उंच रस्ता दुभाजक होता. उंच आणि अरुंद! त्यामुळे रस्ता दुभाजक रस्त्याचा कमी भाग व्यापत. ३-४ फूट उंच अशा या दुभाजकांमुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रखर प्रकाश झोत आपल्या डोळ्यात जात नसत. तसेच अशा उंच दुभाजकांमुळेच पादचारीही वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत नसत. त्याचवेळी एस एन डी टी येथे रस्ता ओलांडण्यासाठी एक उंच पूल उभारण्यात आला. अनेक वर्ष उलटून गेल्यामुळे इथला जुना रस्ता दुभाजक खराब झाला. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर नवा रस्ता दुभाजक टाकण्यात आला. सध्या या दुभाजकाची उंची १-१.५ फूट आहे. कोणताही पादचारी वाट्टेल तिथे सहजपणे पाय टाकून रस्ता ओलांडू शकतो. याच्यावर बसवलेले रिफ्लेक्टर केव्हाच खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी समोरच्या वाहनांचा प्रकाश झोत थेट डोळ्यात जातो. एकूणच हा रस्ता दुभाजक अत्यंत निर्बुद्ध पद्धतीने बसवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
२) कर्वे रस्ता- कर्वे पुतळा ते शिवाजी पुतळा.
या रस्त्यावर पक्का रस्ता दुभाजक नाही. सिमेंट चे ठोकळे रस्त्यावरच आडवे टाकण्यात आलेले आहेत. त्यातील काही आपली रांग सोडून बेशिस्त पद्धतीने बाहेरही आलेले आहेत. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशात या ठोकळ्यांना धडकून पडण्याचे चार चाकी गाड्यांचे नुकसान होण्याचे प्रकार अधून मधून घडत असतात. महापालिकेच्या निर्बुद्ध आणि निष्काळजीपणाची हद्द...!!
३) पौड रोड
पौड रोड चे काम गेले अनेक वर्ष सुरूच आहे. तिथे राहणाऱ्यांनाही ते कधीपासून सुरु आहे ते आठवत नसावे!!! नव्यानेच होत असलेल्या किंवा झालेल्या या रस्त्यावर वरीलप्रमाणेच सिमेंट चे ठोकळे रस्ता दुभाजक म्हणून ठेवण्यात आले आहेत. फरक इतकाच की पौड रस्त्यावरचे हे ठोकळे जमिनीत पक्के करण्यात आलेले आहेत. एकूणच कर्वे रस्त्याप्रमाणेच इथेही पादचारी वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत वाहन चालकांची परीक्षा पाहतात. पहिल्या लेन मधून नेहमीच वाहतुकीचा वेग जास्त असतो. अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राण गमवावा लागल्यावरच महापालिका जागी होणार आहे का????
४) दांडेकर पूल ते पानमळा
हा रस्ता सिमेंट चा होऊन अनेक वारस उलटली. तेव्हाच हा रस्ता दुभाजक एखाद्या फुटपाथ सारखा का बनवण्यात आला हे खरोखरच न उलगडणारे कोडे आहे. वाट्टेल तेथून रस्ता ओलांडणारे पादचारी, या रस्ता दुभाजकावर खेळणारी लहान मुले, किंवा तेथेच निवांत झोप काढणारे लोक या सगळ्यामुळे येथून गाडी चालवणे मोठे जिकीरीचे काम असते.
५) औंध रस्ता आणि बाणेर रस्ता
काहीच वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेले हे दोन प्रशस्त रस्ते. इथले रस्ता दुभाजक पौड रस्त्याप्रमाणेच करण्यात आले याचे कारण निष्काळजीपणा पेक्षा निर्बुद्धपणाच आहे. इथले रस्ता दुभाजक हे उंच आणि मध्ये झाडे लावता येण्या योग्य असे रुंदही करता आले असते. पण महापालिकेला विचार करायची इछाच नाही की काय असा प्रश्न पडतो.
"कॉमन सेन्स" या सदराखाली मोडणारा विचारही महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक करत नाही याची प्रचीती फक्त रस्ता दुभाजकांकडे बघितल्यावरही येते...
(मी जेव्हा "महापालिका" असे म्हणतो तेव्हा त्यात जसे प्रशासकीय अधिकारी येते तसेच नगरसेवक म्हणजेच लोकप्रतिनिधीही, येतात. कोणत्याही एकाच घटकाला पूर्ण दोष देणे अयोग्य ठरेल.)
चांगले रस्ता दुभाजक:
जसे निर्बुद्ध पद्धतीने लावलेले रस्ता दुभाजक आहेत तसेच काही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ता दुभाजकही आहेत. त्याची नोंद करणे आवश्यक आहे.
१) कर्वे रस्ता- पौड फाटा ते कर्वे पुतळा
२) दांडेकर पूल ते सारसबाग.
३) औंध- ब्रेमेन चौक ते परिहार चौक.
अशा प्रकारचे रस्ता दुभाजक सर्वच जागी लावणे आवश्यक आहे. अर्थात योग्य त्या अंतरावर पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची जागा सोडणे आवश्यक आहे. दांडेकर पूल ते सारसबाग रस्त्यावर अशा जागा सोडण्याचा अतिरेक झाला आहे. दर दहा फुटावर रस्ता ओलांडण्याची जागा. याउलट परिस्थिती कर्वे रस्त्यावर पौड फाटा ते कर्वे पुतळा या भागात होती. रस्ता ओलांडायला जागाच नव्हती. अशा गोष्टी टाळून मध्यम मार्ग स्वीकारत रस्ता दुभाजक उभारले पाहिजेत.
"रस्ता दुभाजक" हे महापालिकेच्या निर्बुद्धपणाचे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. अशीच इतर असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा प्रकारची इतर उदाहरणे पुढच्या लेखांमधून द्यायचा माझा प्रयत्न असेल.
Monday, November 1, 2010
बिनडोक महापालिका...
Subscribe to:
Post Comments (Atom)
well said bro! i m with "parivartan" :) \m/
ReplyDeleteतसेच हडपसर येथील रस्ता दुभाजक नको इतका रुंद करून ठेवलाय. अजून काही वर्षांनी त्या जागेत नवीन झोपडपट्टी दिसल्यास नवल वाटणार नाही.
ReplyDelete