परिवर्तन या आमच्या संस्थेची सुरुवात झाली तेव्हा नुकताच २६/११ चा दहशतवादी हल्ला झालेला होता. त्यामुळे अचानक अनेकांना आता आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले होते. त्यांचे हे वाटणे काही दिवसच टिकले. जसजसे दिवस गेले आणि २६/११ च्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. तात्पुरत्या विचारांनी उगीचच आपण समाजासाठी फार काहीतरी करतोय अशा भावनेने आलेले सगळे गळत गेले. काहींचे तर गेल्या दोन वर्षात मी तोंडही पाहिले नाही. असे का घडले असे या गेलेल्या लोकांना विचारले तर प्रत्येक जण असंख्य कारणे सांगेल. असो. ती कारणे ऐकण्यात मला मुळीच रस नाही.
एक सव्वा वर्ष उलटले आणि पुण्यात जर्मन बेकरी मध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत परिवर्तन चे सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते. माझ्या या अनुभवावर मी दैनिक सकाळ मध्ये एक लेख लिहला होता. तो वाचून असंख्य लोकांना पुन्हा एकदा आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले. आमच्या पुढच्या मिटिंग ला पुन्हा एकदा ७०-८० लोक हजार होते. जसजसे दिवस गेले आणि जर्मन बेकरीच्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली.
काल पुन्हा मुंबई मध्ये ब्लास्ट झाले आहेत. पुन्हा असंख्य लोकांच्या डोक्यात आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे असणार. ते लोक येतील, आणि उत्साह असेपर्यंत टिकतील. नंतर आपल्या कामात गुंग होतील- पुढचा ब्लास्ट होईपर्यंत...!!!
प्रत्येकाला वैयक्तिक उद्योग आहेत, अभ्यास आहे, मित्र आहेत, करियर आहे. उलट करियर सोडून परिवर्तनचं काम करू नका असं आमचा फाउंडर मेंबर हृषीकेश प्रत्येकाला सांगतो. तो असे सांगतो कारण त्याला हे पक्क माहित्ये की आपले सगळे उद्योग सोडून हे कार्य करायची गरज नाही.
आमचा एक मेंबर आहे, तो भेटला की सांगतो, "अरे यार नेक्स्ट मिटिंग ला नक्की येणार. पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा संपत आहे. मग सगळा वेळ परिवर्तनला"
त्यानंतर दोनेक महिने उलटून जातात,"अरे गावाला गेलो होतो."
मग पुन्हा महिन्या दोन महिन्यांनी त्याचा चेहरा दिसतो,"अरे, कॉलेज आणि सबमिशन्स वगैरे चालू झालंय. अजिबात वेळ नाही."
पुढच्या भेटीच्या वेळी,"अरे कॉलेज मध्ये इव्हेंट्स चालू आहेत. त्यात सगळ्यात मी आहे. सॉरी."
आणि मग त्याच्या पुढच्या भेटीच्या वेळी पुन्हा एकदा त्याची परीक्षा दोन आठवड्यांवर आलेली असते.
काय म्हणावे याला...!
इच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. खरोखरच सकाळी ९ ते रात्री १० असे काम करणारे लोक मी पाहतो जे एवढे जास्त आपल्या कामांमध्ये व्यग्र असतानाही काहीतरी समाजासाठी करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला हे एक उदाहरण...!!
असो.... ज्याला काम करायची इच्छा आहे तो कशातूनही वेळ काढतो आणि काम करतो. ज्याला इच्छा नाही, त्याला वेळ कधीच मिळत नाही.
एक चारोळी या निमित्ताने आठवते:
वेळ नाही ही एक सबब आहे;
वेळ काढणं हे एक कसब आहे.
सबब-कसब असा हा खेळ आहे;
ज्याला जमतो त्याला वेळ आहे..!!
एकच विनम्र आवाहन, सातत्याला महत्व आहे. तात्पुरत्या गोष्टींना नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला कालच्या ब्लास्ट मुळे अचानक देशासाठी काम करावे वाटत असेल त्यांनी स्वतःलाच एकदा विचारून घ्या की हे तात्पुरते वाटणे आहे की खरोखरची तळमळ?? आणि तात्पुरते असेल तर विचार झटकून देऊन आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागा. ते स्वतःशीच अधिक प्रामाणिक वागणे असेल.
No comments:
Post a Comment