Sunday, December 18, 2011

‘परिवर्तना’ची ३ वर्षे!

२६/११ चा हल्ला झाला. सगळेच भारतीय अगदी अस्वस्थ होऊन गेले. टीव्हीला नजर खिळवून श्वास रोखून घडणाऱ्या गोष्टी पाहात होते ऐकत होते... अजूनही ताज मधले सगळे दहशतवादी मेले नव्हते. कसाब ताब्यात आला होता. पोलीस दलातले ज्येष्ठ अधिकारी आणि हवालदार तुकाराम ओम्बाळे शहीद झाले होते. वातावरण अगदी गढूळ होतं.. मनात असहायता भरून आली होती. त्यावेळी मला माझ्या शाळेतल्या मित्राचा इंद्रनीलचा फोन आला, तो म्हणाला ,"आपण काहीतरी केलं पाहिजे.."मी म्हणलं "हो बरोबर आहे. पण आपण काय करणार? हे दहशतवादी येतात आणि आपल्या लोकांना मारतात, आपण काय करणार?"
"२६/११ बाबत नाही... एकूणच आपण काहीतरी केलं पाहिजे. बस्स झाल्या कट्ट्यावरच्या गप्पा..!"- इंद्रनील.

त्यानंतर आम्ही भेटलो बोललो. अजूनही अनेकांशी बोललो. काय करता येईल, एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो. परिवर्तन घडवण्यासाठी काय करू शकतो याविषयी चर्चा सुरु झाली. सामाजिक काम करणाऱ्या शेकडो संस्था पुण्यात असताना आपली अजून एक कशाला असा आम्ही विचार केला. पण लक्षात असं आलं की चांगले प्रशासन यावे, राजकीय व्यवस्था सुधारावी यासाठी कार्यरत असणाऱ्या फारच थोड्या संस्था पुण्यात आहेत. आणि म्हणून याच क्षेत्रात आपण काम केले पाहिजे. त्यासाठी आपल्या विचारांना अनुसरून परिवर्तनची सुरुवात केली पाहिजे. अखेर आपल्यासारखे विचार असणाऱ्या सगळ्यांची आपण एक मिटिंग घेऊया असं मी आणि इंद्रनीलने ठरवलं. सगळ्यात आधी आमच्या मित्रांनाच या मिटिंग साठी बोलावलं. मग त्यांच्या ओळखीतून असंख्य लोकांना मिटिंगचा निरोप पोहचवला. विक्रांत, आशुतोष, प्रसाद, जयदीप असे अनेक जण या मिटिंगला येऊन उपस्थित झाले. आम्ही जेव्हा हा विचार करत होतो. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या भागात हृषीकेश कर्वे आणि त्याचे सगळे मित्र आपण काहीतरी केलं पाहिजे या विचाराने एकत्र येऊन चर्चा करत होते. त्यांना आमच्या मिटिंगचा निरोप हस्ते परहस्ते पोचला. मग तेही या मिटिंग मध्ये आले. ८ डिसेंबर २००८ ला झालेल्या पहिल्या मिटिंगला सुमारे ८० जण उपस्थित होते. सगळे आमच्याच वयाचे २०-२१ वर्षे ! ८० जण पाहून आमचा उत्साह चांगलाच दुणावला. याच मिटिंग मध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर आम्ही "परिवर्तन" या नावावर शिक्कामोर्तब करत कामाला सुरुवात केली. अर्थातच २६/११ च्या धक्क्यामुळे चिडून संतापून, भावनिक होऊन यातले अनेक जण आले होते. त्यामुळे जसजसा २६/११ च्या घटनेचा प्रभाव कमी झाला तसे आमचे सदस्य गळू लागले. पण यामुळे एक फायदा झाला. मनापासून काम करायची तळमळ असणारे तेवढे उरले! त्यानंतर असंख्य चढ उतार आले आणि प्रत्येक वेळी अतिशय मनापासून काम करणारे आणि तळमळ असणारे बहुमोल सदस्य आम्हाला मिळत गेले..!

परिवर्तनच्या कामांना सुरुवात मतदार जागृतीने झाली. त्यानंतर मग सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समितीच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी प्रयत्न, बॉम्ब शोधक व नाशक पथकास मदत, मतदार जागृतीमध्ये जनविधानसभेसारख्या कार्यक्रमांचे आयोजन, युजीसी नियमावलीतील अयोग्य गोष्टी बदलण्यासाठी प्रयत्न, पुणे महापालिकेच्या बहु उद्देशीय नागरी सुविधा केंद्रांबाबत असलेला चुकीचा करार यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने आवाज उठवणे, पुण्यातील नगरसेवकांची महापालिकेतील कामकाजात अत्यल्प उपस्थिती प्रसिद्ध करणे, पीएमपीएमएल च्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे, जर्मन बेकारी ब्लास्टच्या वेळी वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन तिथल्या कामात सुसूत्रता राहण्यासाठी नियोजनबद्ध काम करणे अशी ही परिवर्तनच्या कामांची यादी संपतच नाही. इतर संस्थांबरोबर सेतू, हरित पुणे चळवळ, पुणे नागरिक संघटना, लोकपाल गटाची संकल्पना, जनलोकपालसाठी प्रयत्न अशी विविध कामे परिवर्तन इतर असंख्य संस्थांच्या साथीने करत आहे.

सातत्याने कार्यरत राहणे ही परिवर्तनची खासियत...! सगळे सदस्य विद्यार्थी किंवा नोकरी/व्यवसाय करणारे असूनही आणि सर्व काम voluntary basis वर चालूनही परिवर्तनच्या कार्यात खंड पडलेला नाही. तरुणांच्या अनेक संस्था दुर्दैवाने बंद पडलेल्या किंवा मंदावलेल्या आपण पाहतो. पण हे परिवर्तन बाबत घडले नाही याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आमच्या कामाच्या पद्धतीत असणारी लवचिकता. इथे कोणीच कोणाच्या वर नाही, कोणीच कोणाच्या हाताखाली काम करत नाही. तांत्रिक बाबींसाठी 'पदे' असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा अडसर निर्माण होत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या शक्तीनुसार योगदान देऊ शकतो. त्यामुळेच आजवर २५० लोकांनी परिवर्तन मध्ये हजेरीलावली आहे आणि शक्य तेवढी मदत केली आहे. त्यांच्या योगदानाशिवाय आजचे परिवर्तन उभे राहूच शकले नसते.

परिवर्तन संस्था "चांगले प्रशासन" उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उभी केली. आता चांगले प्रशासन म्हणजे काय याविषयी सविस्तर चर्चेतून आम्ही ९ मुद्दे काढले. गेली ३ वर्षे परिवर्तनचे काम याच ९ मुद्द्यांच्या आधारे चालू आहे. जणू 'परिवर्तनाची नऊ कलमी योजनाच'..! लोकशाही प्रक्रिया, पारदर्शकता, लोकसहभाग, जबाबदार प्रशासन, नियोजन, कायद्यासमोर समानता, द्रुतगती न्यायालयीन प्रक्रिया, नागरिक केंद्रित प्रशासकीय व्यवस्था आणि भ्रष्टाचारमुक्त ही ती कलमे आहेत.

अनेकदा सरकारी कार्यालय म्हणल्यावर तिथे वाईटच अनुभव येणार असे आपण गृहीत धरतो. पण परिवर्तनचं काम सुरु केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की बहुसंख्य सरकारी अधिकारी- कर्मचार्यांनाही बदल झाला तर हवाच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा आम्हाला पाठींबा मिळतो. मदत मिळते. अनेकदा मार्गदर्शन मिळतं (सरकारी खाचाखोचा ज्यांना माहित ते अगदी बिनचूक मार्गदर्शन करतात!). त्यामुळे आम्हाला सरकारी कार्यालयात बहुतेक वेळा चांगलेच अनुभव आले. आणि वाईट अनुभव आलेच नाहीत अशातला भाग नाही. उर्मट अरेरावी करणारेही भेटलेच. पण तुलनेने अत्यल्प. आणि त्याही वेळी आम्ही नागरिक आहोत आणि म्हणून तुम्ही आम्हाला मदत केलीच पाहिजे असे ठणकावून (तरीही नम्रपणे !) सांगितल्यावर अनेकांनी नंतर मदतही केली. परिवर्तनच्या कामांच्या अनुभवामुळे सरकारी ऑफिस म्हणजे 'न जायचे ठिकाण' ही आमची मानसिकता बदलली. आणि आपण सर्वांनीच नागरिक म्हणून खरोखरच ही मानसिकता बदलायला हवी आहे (कारण आपण या देशाचे मालक आहोत, गरीब बिचारी जनता नव्हे!!)!

सामान्यतः "आम्ही राजकीय आहोत" असे म्हणले की लोक बिचकतात. लोकशाहीमध्ये ( जिथे लोकांची लोकांसाठीची राजकीय व्यवस्था असते ) राजकीय या शब्दाला लोक बिचकतात ही गोष्ट खरे तर दुर्दैवी आहे. जितके आपण राजकारणापासून दूर जाऊ तितके आपण लोकशाहीपासून दूर जाऊ. कारण लोकशाहीमध्ये राजकारण आणि लोक हे वेगळे राहूच शकत नाहीत आणि म्हणूनच आमच्या ९ मुद्द्यांमध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे लोकशाही! आम्ही राजकीय आहोत असे म्हणल्यावर अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे "तुम्ही कोणत्या पक्षाचे?". राजकीय आहोत म्हणजे कोणत्या पक्षाचे असले पाहिजे ही समजूत चुकीची आहे. एक सामान्य नागरिक म्हणूनही तुम्ही आम्ही राजकीय असू शकतो. असो, तो स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. आम्ही राजकीय आहोत, आम्ही राजकारणाशी संबंधित वरील ९ मुद्दे घेऊन काम करतो आहोत. (हे ९ मुद्दे घेऊन राजकारणापासून दूर राहून काम करणे अशक्य आहे...!) आणि हे परिवर्तनचे वेगळेपण आहे. इतकी स्पष्ट आणि स्वच्छ राजकीय भूमिका घेऊन काम करणाऱ्या संस्था आणि लोक आज तरी कमी आहेत. ही संख्या भरपूर वाढावी यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत. म्हणूनच ९ मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसहभाग! त्यामुळेच मला सगळ्यांना आवाहन करावेसे वाटते की तुमच्या सहभागाशिवाय हे कार्य करणे अशक्य आहे.

परिवर्तनला वेळोवेळी असंख्य लोकांनी मार्गदर्शन केले, आधार दिला, पाठींबा दिला. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे प्रोत्साहन दिले! यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, जनवाणीच्या माजी संचालिका किशोरी गद्रे, पक्ष बाजूला ठेवून संवाद साधणारे अनिल शिदोरे, राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर, पत्रकार आनंद आगाशे, डॉ.अनिल अवचट अशा मान्यवरांचा सहभाग आहे. त्यांचा असणारा पाठींबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळे परिवर्तनचे काम अधिकाधिक जोमात सुरु आहे..!

या डिसेंबर मध्ये परिवर्तनला तीन वर्ष पूर्ण झाली. अजून खूप काही काम आम्हाला, नव्हे आपल्याला करायचे आहे. आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे. प्रशासन सुधारावे, राजकीय व्यवस्था सुधारावी, भारत खरोखरच सुखाने जगणाऱ्या नागरिकांचा समर्थ देश असावा असे ज्यांना वाटते अशा सर्वांचे परिवर्तन मध्ये हार्दिक स्वागत आहे. धर्म, लिंग, जात, आर्थिक स्तर, प्रांत, भाषा, वंश असल्या कुठल्याही भेदांच्या पलीकडे जाऊन वरील ९ मुद्द्यांना अनुसरून कार्यरत राहण्याची इच्छा असलेला प्रत्येक जण परिवर्तनचा सदस्य आहेच..! मग वाट कसली पाहताय? इच्छा आहे, तळमळ आहे ना मग या आणि सामील व्हा! एकत्र मिळून परिवर्तन घडवूया..!

- तन्मय कानिटकर

डिसेंबर २०११

Friday, December 9, 2011

Parivartan's 3rd Anniversary...!

डिसेंबर मध्ये परिवर्तनला तीन वर्ष पूर्ण होत आहेत... त्या निमित्त रविवार ११ डिसेंबर २०११ रोजी एक कार्यक्रम आयोजित केला आहे

परिवर्तन पुरस्कार वितरणही याचवेळी होईल.
आपला पाठींबा-मदत-आशीर्वाद कायमच परिवर्तन बरोबर राहिला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण भविष्यातल्या परिवर्तनाच्या आमच्या प्रयत्नांना शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती.


प्रमुख पाहुणे : डॉ. अनिल अवचट .


Date : 11 December, 2011 Sunday.
Time : 6 to 8:30pm.
Venue :
Patrakar Bhavan, near SM Joshi Bridge, Navi Peth, Pune 30.

Do attend. Invite your Friends too ...!!!

Facebook Event : http://www.facebook.com/events/139270399507812/