Tuesday, December 7, 2010

रद्दीचा महिमा...!!

"मला परिवर्तनचं काम करायची खूप इच्छा आहे रे. पण नोकरीमुळे शक्य नाही.", माझ्या एका मित्राने मला सांगितले.

"तू दर महिन्याला तुझ्या घरातली रद्दी दे. तेवढं करू शकलास तरी खूप मदत होईल.", माझ्या या उत्तरावर तो बुचकळ्यात पडला. "रद्दी?? त्याने काय होणार??" त्याला काहीच कळेना...

कोणत्याही सामाजिक संस्थेला दोन महत्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे उत्तम कार्यकर्ते आणि काम करण्यासाठी पैसे.

कोणतंही काम करायचं तर पैसे लागतातच.. परिवर्तनच्याही कामाला पैशाची गरज पडते. माहिती अधिकारात अर्ज दाखल करायचे असतात, येणाऱ्या माहितीसाठीचे पैसे द्यावे लागतात. कार्यक्रम असतात, पत्रकार परिषदा असतात, पोस्टर बनवायची असतात... एक ना अनेक गोष्टी. या सगळ्यासाठी पैसे गोळा करणे हा एक मोठा कठीण उद्योग असतो. त्यावर इतर काही सामाजिक संस्थांप्रमाणेच आमचाही तोडगा म्हणजे "रद्दी संकलन"...!!! गेले दीड ते दोन वर्ष काही घरातून दर महिन्याला रद्दी गोळा करून ती विकून जे पैसे गोळा होतात ते परिवर्तन साठी वापरले जातात. दर महिन्याची रद्दी गोळा करून असे कितीसे पैसे गोळा होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. इतकेच काय आमच्या काही सदस्यांनाही अजून रद्दीचा महिमा नीटसा उमजला नाहीये. एक वर्तमानपत्र असेल तर दर महिन्याला किमान ४५ ते ५० रुपयाची रद्दी साठते. दोन वर्तमानपत्र अनेकांच्या घरात असतात. त्यामुळे प्रत्येक घरातून किमान ८० ते १०० रुपयांपर्यंतची रद्दी मिळू शकते. आणि विश्वास नाही बसणार, पण फक्त रद्दी संकलनातून एक सामाजिक संस्था चालू शकते...

परिवर्तनच्या कामात हातभार लावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. गेल्या दीड वर्षात ६००० पेक्षा जास्त रुपये केवळ घरांमधील रद्दीतून जमा झाले. घरातील रद्दी जर एवढा हातभार लावत असेल तर अनेक घरातल्या रद्दीतून खूपच कामाला हातभार लागेल.

केवळ १०० घरातील रद्दी दर महिना गोळा होऊ शकली तर त्यातून किमान ६००० रुपये दरमहा गोळा होऊ शकतात. परिवर्तन च्या कामाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी या इंधनाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या कोणाला परिवर्तनचे प्रत्यक्ष काम करणे शक्य नाही. त्याने आपल्या घरातील रद्दी परिवर्तनला द्यावी. आपले हे योगदान सुद्धा चांगल्या परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक पाऊल असेल.

No comments:

Post a Comment